
युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यावर संयुक्त राष्ट्रांच्या मतदानात चीनने संयुक्त राष्ट्राच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले. ‘चायना टाइम्स’ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यूएनकडून आलेल्या प्रस्तावात रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा उल्लेख करून विशेष लष्करी कारवाईची मागणी केली होती. 26 एप्रिल रोजी यूएनकडून प्रस्ताव आला होता. या प्रस्तावात युरोपियन कमिशनसोबत सहकार्य मजबूत करण्याबाबत चर्चा होती. “रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युरोपला विलक्षण अडचणींचा सामना करावा लागत आहे”, असे या प्रस्तावात म्हटले होते.
या ठरावाच्या एका परिच्छेदात रशियाची युक्रेनमधील आक्रमकता सांगण्यात आली होती. जॉर्जियामध्येही रशियाने अशीच आक्रमकता दाखविल्याचे त्यात लिहिले होते. या संपूर्ण विधेयकावर सर्वसाधारण सभेत मतदान झाले. यावेळी 122 देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, पाच देशांनी विरोधात मतदान केले, तर 18 देश अनुपस्थित राहिले. यावेळी रशिया आणि बेलारूसने विरोधात मतदान केले. चीनने ठरावाच्या बाजूने मतदान केले. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर चीनने रशियाचा निषेध केलेला नाही, तसेच त्याने रशियासाठी ‘आक्रमकता’ हा शब्दही वापरला नाही.
संयुक्त राष्ट्रांच्या मते, कोणत्याही देशाची प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा करणे आवश्यक आहे.
चीनमधील ‘फुदान’ विद्यापीठातील ‘सेंटर फॉर अमेरिकन स्टडीज’चे प्राध्यापक झांग जियाडोंग यांनी संकेतस्थळावर एक लेख लिहिला आहे की, “चीनचे यावेळी दिलेले मत हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि गोंधळात टाकणारे आहे. मसुद्यात युक्रेनविरुद्ध रशियाच्या विशिष्ट लष्करी कारवाया ‘आक्रमकता’ म्हणून स्पष्टपणे नमूद केल्या आहेत. अशा स्थितीत चीनने रशियाचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाच्या बाजूने मतदान करणे ही दुर्मिळ प्रतिक्रिया मानली पाहिजे.”