
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी लाहोर उच्च न्यायालयात सांगितले की, त्यांच्याविरुद्ध तिसरा हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. नियमित न्यायालयात हजेरी लावल्याने आपला जीव धोक्यात येईल, असा दावा करून खान यांनी आपल्यावरील सर्व राजकीय खटले फेटाळण्याची विनंती केली. देशद्रोह, ईशनिंदा, हिंसाचार आणि दहशतवाद यासारख्या विविध आरोपांखाली देशातील विविध शहरांमध्ये दाखल केलेले सर्व १२१ गुन्हे रद्द करण्याची विनंती करणारी याचिका खान यांनी न्यायालयात दाखल केली आहे.
याचिकेनुसार ही प्रकरणे राजकीय कारणावरून करण्यात आली आहेत. मंगळवारी खान कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर झाले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपल्याला बोलू द्यावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली.
त्यांनी न्यायालयाला सांगितले, ”मी जर नियमितपणे न्यायालयात हजर राहिलो, तर माझ्या जीवाला धोका आहे. मी दोन हत्येच्या प्रयत्नांतून वाचलो. एक प्रयत्न पंजाबच्या वजिराबादमध्ये झाला. दुसरा इस्लामाबाद न्यायालयीन संकुलात झाला. त्यांना मला मारायचे आहे आणि तिसरा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.”
आपल्या ७० वर्षांच्या आयुष्यात आपल्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल झालेला नाही. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पंतप्रधान पदावरून हटविल्यानंतर हे सर्व खटले दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती अली बकर नजाफी यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने खान यांना 5 मे रोजी पोलिस तपासात सहभागी होण्याचे निर्देश दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
“न्यायालयाने व्हिडिओ लिंकद्वारे पोलीस तपासात सामील होण्याच्या खान यांच्या विनंतीवर विचार केला नाही. न्यायालय 8 मे रोजी पुन्हा सुनावणी घेणार आहे.”