सुगंधित सोनचाफा
सोनचाफा हे सर्वात लोकप्रिय फुलझाडांपैकी एक आहे. खोली सुगंधित करण्यासाठी, फुलांच्या हारात, तसेच धार्मिक समारंभांमध्ये, सुशोभिकरणासाठी या फुलांचा उपयोग केला जातो. जमिनीतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्यासाठी हे झाड उपयुक्त आहे.

या झाडाची पाने पालापाचोळा देतात. या झाडांमुळे जमिनीचा सामू सुधारतो. मातीतील सेंद्रिय कार्बन आणि फॉस्फरसचे प्रमाण वाढून झाडाखालील माती सुधारते. म्हणून याची लागवड जमिनीच्या पुनर्वसनासाठीही केली जाते. त्याची पाने ही रेशीम किडे आणि फुलपाखरांच्या अळ्यांचे खाद्य आहे. या झाडांना भरपूर प्रकाश आणि उबदारपणा हवा असतो. सकाळचा सूर्यप्रकाश आणि उर्वरित वेळेत आंशिक प्रकाश असल्यास तो उत्तम असतो.

ही वनस्पती लहान असताना त्याची मूळप्रणाली विकसित होण्याकरिता या झाडाला भरपूर पाणी द्यावे. मोठ्या झाडांना माफक प्रमाणात पाणी द्यावे. वसंत ऋतूमध्ये खतमात्रा द्यावी. हिवाळ्यात रोपांची छाटणी करावी. ही वनस्पती पोषक परिस्थितीत 30 मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. या वनस्पतीला आंब्याच्या पानांसारखी मोठी पाने असतात. मे ते ऑक्टोबर या कालावधीत ही झाडे फुलांनी बहरतात. या फुलांचा मोहक सुगंध संपूर्ण परिसराला सुगंधित करतो. सोनेरी – पिवळी, सोनेरी – नारिंगी आणि मलईदार – पांढरी अशा रंगांमध्ये ही फुले असतात.
व्यावसायिकदृष्ट्या या वनस्पतीचे लाकूड वस्तू बनविण्यापासून ते सरपणापर्यंत वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरले जाते. या फुलांचा अर्क प्रसिद्ध ‘जॉय’ परफ्यूम तयार करण्यासाठी वापरला जातो. फुलांपासून काढलेले तेल संधिवातासाठी, डोळ्यांचा त्रास दूर करण्यासाठी वापरले जाते.