
गोव्यात आजपासून ‘शांघाय को-ऑपरेशन समिट’मधील सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक होत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर त्यांचे चिनी समकक्ष छीन कांग आणि रशियाचे सर्गेई लावरोव यांच्याशी गोव्यातील बीच रिसॉर्टमध्ये द्विपक्षीय चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे, पाकिस्तानी समकक्ष बिलावल भुट्टो – झरदारी आणि इतर देशांचे परराष्ट्र मंत्री या महत्त्वपूर्ण शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ही दोन दिवसीय बैठक गोव्यातील पॉश बीच रिसॉर्टमध्ये होईल, तर मुख्य चर्चा शुक्रवारी होईल. सूत्रांनी सांगितले की, एस. जयशंकर जवळजवळ सर्व देशांमधील त्यांच्या समकक्षांशी स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा करतील.
तथापि, जयशंकर आणि बिलावल यांच्यात द्विपक्षीय बैठक होईल की नाही याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री यांच्यातील गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी द्विपक्षीय बैठक असेल. ‘जी-20’ परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री मार्चमध्ये भारतात आले होते. या बैठकीच्या प्रसंगी त्यांच्यात चर्चा झाली. यादरम्यान, त्यांनी त्यांना सांगितले होते की, पूर्व लडाखमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या सीमा विवादामुळे भारत – चीन संबंधांची स्थिती ‘असामान्य’ आहे.
या संघटनेची स्थापना सन 2001 मध्ये शांघायमध्ये झाली. चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा यात समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान सन 2017 मध्ये या संघटनेचे स्थायी सदस्य झाले.