दुर्गम गावातील मुलांसाठी सचिनची शाळा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी नुकताच आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला. ‘क्रिकेटचा देव’ अशी उपाधी लाभलेले सचिन खऱ्या आयुष्यात गरीब मुलांचे तारणहार बनले आहेत. सन 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन त्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक कामे केली. आता ‘सचिन तेंडुलकर फाऊंडेशन’ मध्य प्रदेशातील ‘संदलपूर’ या दुर्गम गावात गरीब मुलांसाठी शाळा बांधणार आहे.

‘सचिन तेंडुलकर फाऊंडेशन’ आता मध्य प्रदेशातील ‘देवास’ जिल्ह्यातील ‘खाटेगाव’ तालुक्यात असणाऱ्या या गावात पोहोचले आहे. सन २०११ च्या आकडेवारीनुसार या गावातील साक्षरतेचे प्रमाण कमी असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच या फाऊंडेशनने तेथे शाळा बांधण्याचा आणि पुढील 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सुमारे 2,300 मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सचिन तेंडुलकर फाऊंडेशन’ ने ही शाळा तेंडुलकरच्या पालकांना समर्पित केली आहे.
सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे विक्रम नोंदवले आहेत. 100 आंतरराष्ट्रीय शतके करणारा ते जगातील एकमेव फलंदाज आहेत. 200 कसोटीत 15921 धावा, 463 वनडेत 18426 धावा त्याने जमविल्या आहेत.

खाटेगाव तहसीलमधील ‘संदलपूर’ हे एक दुर्गम गाव आहे. हे गाव उज्जैन विभागातील असून ‘देवास’ पासून सुमारे 1125 किमी. अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाचा साक्षरता दर ५६.६ टक्के आहे. तो वाढवण्यासाठी सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने एक मोठे पाऊल उचलले आहे. या फाऊंडेशनची स्थापना सामाजिक बदल घडविण्यास उत्सुक असलेले लोक, संस्था आणि संसाधने यांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ देण्याकरिता करण्यात आली. हे फाऊंडेशन मुख्यत्वे देशभरातील गरीब पार्श्वभूमी असलेल्या मुलांना चांगल्या दर्जाचे जीवन देण्यावर कार्य करते. पुढील पिढीसाठी चांगले जग निर्माण करणे हे याचे उद्दिष्ट आहे.