भारत चीन सीमेवरील भूतान
भूतान हा भारताच्या शेजारी असलेला एक लहानसा आणि आनंदी देश आहे. या देशात बौद्ध, हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्माचे लोक राहतात. या देशात फक्त बौद्ध मंदिरे, मठ आणि काही हिंदू मंदिरे आहेत; मात्र मशीद, चर्च ही प्रार्थनास्थळे येथे नाहीत.

या देशाची एकूण लोकसंख्या 7.5 लाख आहे. यामध्ये 84.3 टक्के लोकसंख्या बौद्ध धर्म मानणाऱ्यांची आहे. त्यामुळे तेथे बौद्ध मंदिरे आणि मठ विपुल प्रमाणात आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हिंदू लोकसंख्या ११.३ टक्के आहे. त्यांचीही मंदिरे आणि धार्मिकस्थळे आहेत. काही वर्षांपूर्वी, भूतानच्या राजाने स्वतः राजधानी ‘थिम्पू’ मध्ये एक भव्य हिंदू मंदिर बांधले आहे. भूतानमध्ये मुस्लिम लोकसंख्या अवघी १ टक्के आहे. भूतानमध्ये मुस्लिमांची एकूण संख्या सुमारे ५००० आहे. अनेक दिवसांपासून ते तेथे मशीद बांधण्याची मागणी करीत आहेत, परंतु अधिकृतपणे तेथे एकही मशीद नाही, किंवा सरकारने परवानगी दिली नाही. त्याचप्रमाणे ख्रिश्चन धर्मही प्रदीर्घ काळापासून आहे, पण भूतान सरकारने त्यांनाही चर्च बांधण्याची परवानगी दिली नाही. भूतानला भेट देणाऱ्या मुस्लिम पर्यटकांना नमाज अदा करण्यासाठी ‘बुमथांग’ मध्ये अधिकृतपणे एक छोटे प्रार्थना सभागृह आहे. येथे तीन स्वतंत्र खोल्यांमध्ये मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चनांना प्रार्थना करण्याची परवानगी आहे. तथापि, पर्यटकांना त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये देखील प्रार्थना करण्याची परवानगी आहे.

येथे अनेक हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. येथील हिंदू सामान्यतः गणेश आणि दुर्गामातेची पूजा करतात. शतकानुशतके हा देश भारताच्या कूचबिहार राजवंशाच्या अधिपत्याखाली होता; परंतु त्यानंतर येथील बहुतेक लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ‘थिम्पू’ येथे मशीद असल्याची माहिती महाजालावर असली तरी अधिकृतपणे ती नाही. काही मुस्लिमांनी त्यांच्या घरांवर मिनार बांधले असून तिथे ते प्रार्थना करतात. भूतानमध्ये राहणारे बौद्ध सामान्यतः ‘वज्रयान’ शाखेचे आहेत; परंतु भूतान प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य देतो.