
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला आणीबाणीच्या वर्गवारीतून वगळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अद्यनोम गेब्रेयसस यांनी ही घोषणा केली. ‘कोविड-१९’ आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या १५ व्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघटनेने म्हंटले आहे.
कोरोना या रोगाला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेतून वगळले असले तरी याचा अर्थ असा नाही की, कोरोना संपला आहे, असेही गेब्रेयसस म्हणाले. आताही कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे दर 3 मिनिटाला एका व्यक्तीचा जीव जात होता. या रोगाचे वेगवेगळे व्हेरिएंट समोर येत आहेत. त्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
३० जानेवारी २०२० रोजी ‘कोविड-१९’ ला त्यांनी जागतिक आणीबाणी म्हणून जाहीर केले होते. या रोगामुळे आतापर्यंत जगभरात २ कोटींहून अधिक लोकांनी प्राण गमावले असावेत, असेही गेब्रेयसस यांनी यावेळी सांगितले.