
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करताच राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. कार्यकर्त्यांकडून 2 दिवस त्यांची मनधरणी करण्यात येत होती. पक्षाच्या निवड समितीनेही त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता.या पार्श्वभूमीवर, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी शुक्रवारी आपला राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार हे नाव निश्चित झाले.
त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबत सामान्य नागरिकांनाही धक्का बसला होता. शरद पवार यांच्या या पत्रकार परिषदेत अजित पवार गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आले होते. यावेळी अजित पवार यांच्या गैरहजेरीचे चुकीचे अर्थ काढू नका, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.

शरद पवार यांनी राजकीय आत्मचरित्र ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात मोठा गदारोळ झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती शरद पवार यांना केली. अखेर पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकत्र जल्लोष केला.