रेनकोट कव्हर निर्मिती
प्रत्येक व्यक्ती आपले वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत असते. चारचाकी गाड्या झाकण्यासाठीचे प्लास्टिक आच्छादन, तसेच पावसाळ्यात शरीर भिजू नये यासाठी वापरले जाणारे रेनकोट बनवून ते विकणे हा एक उत्तम चालणारा उद्योग आहे. शहरातील बहुतेक लोक सदनिकांमध्ये राहतात. बहुमजली इमारतींमध्ये प्रत्येक वाहन इमारतीच्या पार्किंगमध्ये लावले जाते. वाहनांच्या गर्दीत आपले वाहन सुरक्षित राहावे म्हणून ते कव्हरने झाकून ठेवले जाते. यामुळेच बाराही महिने कव्हरची मागणी असते.

वाहन कव्हर किंवा रेनकोट तयार करण्यासाठी वॉटरप्रूफ कापड खरेदी करावे लागते. रेनकोट बहुधा पावसाळ्यापूर्वी तयार करून बाजारात विक्रीस ठेवावे लागतात. हा उद्योग करण्यापूर्वी उत्पादन कुठे विकायचे, त्या आवारात कोणत्या कंपनीचे, कोणत्या आकाराचे रेनकोट जास्त मागणी मिळविणारे ठरू शकतात, या पार्श्वभूमीचा अभ्यास करायला हवा. त्यानंतर आपली उत्पादने तयार करावीत. एकाच आकाराच्या पण वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसतात. त्यामुळे वाहनांची कव्हर्स बनविताना ‘फ्री साइज’ कव्हर तयार केल्यास अनेक कंपन्यांच्या मॉडेल्सना एकच कव्हर बसू शकेल.
वाहन कव्हर बनविताना आपण आपल्या आवडीची कव्हर विविध आकर्षक रंगांमध्ये देऊ शकता. वाहन कव्हर तयार करण्यासाठी, आपणास कापणे आणि शिवणे याबाबत प्रशिक्षण घ्यावे लागेल. एक अकुशल आणि एक कुशल मजूर इतके मनुष्यबळ आपणास लागेल. शिंपी ज्या पद्धतीने कपडे शिवतात, त्या कृतीनुसार ‘फ्री साइज’ वॉटरप्रूफ रेनकोट बनवावेत. मागणीनुसार विविध वयोगटातील मंडळींसाठी रेनकोट शिवावेत.
तुमच्याकडे असलेल्या आकारानुसार कापड कापल्यानंतर विशिष्ट शिवणयंत्रावर तुम्हाला हव्या त्या आकारानुसार शिलाई करा. पावसापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक रेनकोट खरेदी करतात. जेणेकरून ते स्वतः आणि त्यांचे कपडे ओले होत नाहीत. त्यामुळे रेनकोट तयार करताना त्याच्या ‘वॉटरप्रूफिंग’चीही काळजी घ्यावी लागते. या व्यवसायाच्या यशासाठी ‘वॉटरप्रूफिंग’ हीच मूलभूत संकल्पना आहे. रेनकोट शिवल्यानंतर ‘हिट-प्रोसेस’ पद्धतीने त्याला चेन आणि बटणे जोडा. तयार रेनकोट वेष्टनबंद करून बाजारात न्या.

प्रशिक्षण घेतल्यावर रेनकोट किंवा कार कव्हर तयार करण्याचे काम सहज शिकता येते. कमी भांडवलात ग्रामीण किंवा शहरी बेरोजगारांना व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करता येते. तुम्ही कोणत्याही राज्यात कुठेही हा व्यवसाय सुरू केलात, तरी यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. विक्रीसाठी रस्त्यालगत एखादे छोटे दुकान लावून वाहनांची कव्हरही विकता येतात. त्यासोबतच घाऊक व्यापारी, कपड्यांची दुकाने, सुपर मार्केट, मॉल्स या ठिकाणी रेनकोट किंवा कार कव्हर विकले जातात. विक्री प्रतिनिधी नियुक्त करून आपण आपले उत्पादन विकू शकतात.
गॅरेज, शोरूम, सेवा केंद्रे मालकांना चांगले मार्जिन देऊन कार कव्हरसाठी विक्री केंद्रही सुरू करू शकतात. पॉलिथिनच्या आकर्षक रंगांच्या शीट, वॉटरप्रूफ प्लास्टिककोटेड कापड, धागा, बटणे, चेन,इ. कच्चा माल या उद्योगासाठी लागतो. शिवणयंत्र, काज-बटणे लावण्यासाठी हीट प्रोसेस मशीन ही यंत्रसामग्री आणि कटिंग टेबल, टेलरिंग मटेरियल, टूल्स हे साहित्य यासाठी आवश्यक असते.