
कॅनडा आणि चीनमध्ये नवीन राजनैतिक वाद निर्माण झाला आहे. चीनवर टीका करणाऱ्या कॅनडाच्या खासदाराला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या चिनी राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्याची घोषणा कॅनडाने सोमवारी केली. या अधिकाऱ्यास 5 दिवसात कॅनडा सोडण्यास सांगण्यात आले आहे.
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी सांगितले की, “आम्ही आमच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणत्याही प्रकारचा परकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही. आपल्या लोकशाहीचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, या संकल्पावर आम्ही ठाम आहोत. कॅनडातील परदेशी अधिकाऱ्यांनी असे वर्तन केल्यास त्यांना मायदेशी पाठवले जाईल.”
दुसरीकडे कॅनडाने आमच्याशी राजनैतिक संबंध तोडले. आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. कॅनडाने एका चिनी राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करून दोन्ही देशांचे संबंध बिघडवल्याचे चीनचे म्हणणे आहे. कॅनडातील चिनी दूतावासाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “चीनची बाजू याला जोरदार प्रत्युत्तर देईल. यातून उद्भवणाऱ्या सर्व परिणामांना कॅनडा स्वतः जबाबदार असेल.”
चीनने कॅनडावर जाणीवपूर्वक संबंध तोडल्याचा आरोप केला. टोरंटोमधील चिनी वाणिज्य दूतावासातील अधिकारी झाओ वेई यांना 5 दिवसांत कॅनडा सोडण्यास सांगण्यात आले आहे, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका सूत्राने सांगितले. कॅनडाने गेल्या आठवड्यात चीनच्या राजदूतालाही बोलावले होते, ज्याचा चीनने निषेध केला होता. चीन आणि कॅनडाचे संबंध 2018 पासून बिघडलेले आहेत. कॅनडातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची अटक आणि त्यानंतर 2 कॅनेडियन नागरिकांना चीनमध्ये ताब्यात घेतल्याने याला सुरुवात झाली होती.