
पुणे जिल्ह्यातील जेजुरी या गावी खंडोबाचे देवस्थान आहे. येथे भाविकांची सतत गर्दी असते. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून ते ‘जेजुरीचा खंडोबा’ या नावाने परिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने मंदिर होते, इसवी सन १७१२ मध्ये जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. या देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत.
सुमारे 200 पायऱ्या चढून वर गेल्यावर ‘मल्हारी मार्तंड’ म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. या देवस्थानच्या डोंगरास ‘नवलाख पायरीचा डोंगर’ असेही म्हटले जाते. हे देऊळ अतिशय सुंदर आहे. मंदिरातील सभामंडप आणि गाभारा प्रेक्षणीय आहे. मंदिरात म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा 3 मुर्त्या आहेत. तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वास्तू जतन करून ठेवल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ येथे दरवर्षी खेळला जातो. जास्तीत जास्त वेळ तलवार उंच धरून ठेवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस दिले जाते. चैत्री पैर्णिमा, विजयादशमी, चंपाषष्ठी आणि सोमवती अमावस्या या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. तसेही भाविक दर्शनासाठी नेहमी गर्दी करतात.

खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. मराठा, कुणबी, धनगर, आगरी, कोळी आणि इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत आहे. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे लक्ष वेधून घेणारी आहेत. हे ठिकाण पुण्यापासून ५२ किमी. अंतरावर आहे. येथील मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा दैवत महाराष्ट्रात आणि कर्नाटकातही विशेष प्रसिद्ध आहे.
पायऱ्यांच्या दुतर्फा अनेक दीपमाळा दिसतात. देवळाभोवती फरसबंदी आवार आणि तट आहे. दुसरा बाजीराव आणि अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले तलाव प्रेक्षणीय असून मल्हारराव होळकरांच्या स्मरणार्थ बांधलेले महादेवाचे मंदिरही सुंदर आहे. येथील राममंदिरात एक शिलालेख आहे. आजूबाजूचा प्रदेश सुपीक आहे. येथे नगरपालिका असून धर्मशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा वगैरे आवश्यक सोयी आहेत.