अतिधोकादायक इमारतींबाबत भिवंडी पालिका सतर्क
भिवंडी महापालिकेच्या हद्दीमध्ये २६७ अतिधोकादायक इमारती आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक ३ मध्ये ९० इमारती असल्याची माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. एकूण इमारतींपैकी ६३ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारती रिकाम्या करण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे. महापालिका प्रशासन अतिधोकादायक इमारतींबाबत सतर्क झाले आहे.

पावसाळा एक महिन्यावर आला असून या काळात इमारत कोसळण्याचा अधिक धोका संभवतो. सन २०२० मध्ये एका 3 मजली इमारतीचा पश्चिमेकडील भाग कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला होता. नुकतीच वळगाव येथे कोसळलेली इमारत भिवंडी महापालिकेच्या हद्दीत नसली तरी या दुर्घटनेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करण्याच्या सूचना महापालिका, पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

भिवंडी महापालिका प्रशासनाच्या पाहणीमध्ये शहरामध्ये २६७ अतिधोकादायक इमारती असल्याची माहिती समोर आली आहे. यातील बहुतेक इमारती ३० वर्षे जुन्या असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अतिधोकादायक इमारती महापालिकेकडून रिकाम्या करण्यात येत असून आतापर्यंत ६३ इमारती रिकाम्या केल्याचे तेथीलअधिकाऱ्याने सांगितले.