
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक युवक-युवती आहेत. यांना या काळात अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. याच काळात व्यक्तिमत्त्व विकासापासून ज्ञानसंपन्नतेपर्यंत बऱ्याच गोष्टी मिळून जातात. यावर भाष्य करणारा चित्रपट ‘मुसंडी’ २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे लिखित-निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘मुसंडी’ या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे विशेषतः तरुणाई हा चित्रपट पाहण्यास अधीर आहे.
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, या स्पर्धेमध्ये अपयश आल्याने खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागण्याची जिद्द तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवेल, हा संदेश ‘मुसंडी’ हा चित्रपट देणार आहे. तो प्रत्येकाला आपल्यातील आत्मविश्वासाची जाणीव करून देईल, असा विश्वास दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी व्यक्त केला आहे.

रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी ‘मुसंडी’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घन:श्याम दरवडे (छोटा पुढारी), भाग्यश्री पवार हे कलाकार आहेत. ‘एमपीएससी’ आणि ‘यूपीएससी’ सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा एकच ‘पॅटर्न’ नसतो. तीव्र इच्छाशक्ती, ध्येय गाठण्यासाठी अथक मेहनत, अपयशामुळे खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभे राहून कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण असतील तर यशाची ‘मुसंडी’ मारता येऊ शकते, हा संदेश हा चित्रपटातून देण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘मुसंडी’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यावर अर्थातच प्रेक्षक २६ मेची वाट पाहू लागले आहेत.