
मध्यप्रदेशमध्ये पशुवैद्यकीय रुग्णवाहिका सुरु करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी केली. पशूंच्या आरोग्यासाठी ही रुग्णवाहिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे राज्यात केवळ माणसांसाठीच नाही, तर गोमाता आणि इतर प्राण्यांच्या उपचारांसाठीही रुग्णवाहिका उपलब्ध असणार असल्याचे ते म्हणाले. या रुग्णवाहिकेत एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि औषधे व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असतील, असे चौहान यांनी सांगितले.
आपत्कालीन परिस्थितीत प्राण्यांवर उपचार करण्यासाठी टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आजारी जनावरांना दवाखान्यात नेणे ही मोठी अडचण असते. गावात पशुवैद्यकीय अधिकारी आणि तात्काळ उपचार मिळणे फार अवघड असते. अशा परिस्थितीत प्राणी दगावतात. अनेक कुटुंबांचा चरितार्थ पाळीव प्राण्यांवर अवलंबून असतो. त्यामुळे या प्राण्यांचे मोल त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते. आता या रुग्णवाहिका आल्याने पशुवैद्यकीय रुग्णालयच पशुमालकाच्या दारात हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी भोपाळ येथील लाल परेड मैदानावर ‘गोरक्षण संकल्प परिषदे’चे उद्घाटन केले. राज्यातील सर्व विकास गटांसाठी त्यांनी यावेळी 406 पशुवैद्यकीय रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखवला.