
नवी मुंबईत म्हाडानंतर आता सिडको घरांसाठीची सोडत काढणार आहे. सिडकोने तब्बल 5000 घरे टप्प्यामध्ये विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर घेणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. हल्लीच म्हाडाच्या कोकण विभागातील घरांची सोडत निघाली होती. या सोडतीला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता.
गेल्या 2 वर्षांत सिडकोने 2 टप्प्यात 25 हजार घरांची योजना राबवली. यापैकी सुमारे 7 हजार घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. अनेक ग्राहकांनी देयके भरण्यास असमर्थता दाखविल्यामुळे काही घरे पुन्हा ताब्यात घेतली आहेत. याबाबत सिडकोने जाहिरातही काढली होती. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आता पुन्हा सिडको घरांसाठी सोडत काढत आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर ही प्रस्तावित घरे विकण्याची योजना आहे. ही घरे वाशी, जुईनगर, खारघर मानसरोवर, उलवे, कळंबोली याठिकाणी आहेत.

ठाण्यातही लवकरच सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान, सिडकोने 2 खोल्यांच्या घराचा नवीन पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 2 वर्षांत सिडकोने 2 टप्प्यात 25 हजार घरांची योजना राबवली. आता पुन्हा एकदा नवीन सोडत निघणार असल्याने घरे घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये उत्सुकता जागी झाली आहे.