
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 21 आणि 22 मे रोजी ‘पापुआ न्यू गिनी’च्या दौऱ्यावर जाणार आहेत. ‘पापुआ न्यू गिनी’चे पंतप्रधान आणि कार्यवाहक परराष्ट्र मंत्री जेम्स मारापे यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांचा देश 21 आणि 22 मे रोजी भारतीय पंतप्रधानांच्या यजमानपदासाठी तयार आहे.
या भेटीदरम्यान, मोदी पॅसिफिक बेट राष्ट्राच्या नेतृत्वासोबत द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याबरोबर ‘फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलंड कॉर्पोरेशन’ शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि पापुआदरम्यान अनेक महत्त्वाच्या करारांवरही स्वाक्षऱ्या होणार आहेत.

‘पापुआ न्यू गिनी’चे पंतप्रधान मारापे यांनी शुक्रवारी पापुआ न्यू गिनी येथील भारताचे उच्चायुक्त एम्बासेकर सुंदरमूर्ती आणि उच्चायुक्तांचे मुख्य संपर्क अधिकारी विश्वास सपकाळ यांच्याशी मोदींच्या भेटीसंदर्भात बैठक घेतली. मोदींचे रेड कार्पेटवर स्वागत करण्यात येणार असून त्यांच्या आगमनावेळी त्यांना 19 तोफांची सलामी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी रविवारी 21 मे रोजी संध्याकाळी ‘पोर्ट मोरेस्बी’ येथे पोहोचतील. मोदी तेथे भारतीय समुदायाच्या सदस्यांनाही भेटणार आहेत.
22 मे रोजी पंतप्रधान गव्हर्नर हाऊसला भेट देतील. गव्हर्नर जनरल सर बॉब डेड यांची भेट घेतील. मोदी इंडो-पॅसिफिक बेट राष्ट्रांचे मंच असलेल्या ‘एफआयपीआयसी’च्या शिखर बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर त्यादिवशी पंतप्रधान मारापे यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होईल.