भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा बुधवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. हा दौरा 2 दिवसांचा आहे. आगामी लोकसभा-विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीने पक्षांतर्गत तयारीचा आढावा ते घेणार आहेत. भाजप प्रदेश राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसह अन्य कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतील. नड्डा यांचे प्रत्येक राज्यात दौरे सुरू आहेत. बुधवारी सकाळी ते मुंबईतील देवनार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील.

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर आरबीके सभागृहात केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. बोरिवली येथील अटल स्मृती उद्यानात विविध क्षेत्रातील बुद्धिवंतांशी संवाद साधणार आहेत. मुंबई प्रदेश सुकाणू समितीच्या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि निवडणूक तयारीचा गोषवारा त्यांना सादर करण्यात येणार आहे.

गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून प्रभादेवीला सिद्धिविनायकाचे दर्शन घेतील. दादर येथे सावरकर स्मारकासही ते भेट देणार असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक गुरुवारी १८ मे रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून नड्डा यांच्या उपस्थितीत बैठकीचा समारोप होणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीनंतर नड्डा राज्यातील खासदार आणि आमदारांची बैठक घेणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली.