छत्रपती संभाजीनगर शहरातील ग्रंथालयात ‘बालकुमार ज्ञान कोपरा’
मोबाईलमुळे वाचन संस्कृती हरवत चालली आहे. सध्या शाळेच्या सुट्ट्या सुरु असून मुलांकडे भरपूर वेळ आहे. या वेळेत मुले दिवसरात्र मोबाईलमध्ये गर्क असलेली दिसून येतात. या समस्येवर मात करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय विभागीय ग्रंथालयामध्ये ‘बालकुमार ज्ञान कोपरा’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मुलांना वाचण्यासाठी 4 हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या उपक्रमास मुलांसह पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालक वर्गातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. मुलांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी तशा प्रकारचे उपक्रम असणेही गरजेचे असते. शहरात असा उपक्रम सुरु झाल्याने मुलांचीही पौष्टिक बौद्धिक खाद्याने वाचनभूक भागविली जात आहे.

सध्या शाळांमध्ये उन्हाळ्याची सुट्टी सुरू असल्याने मुले वेगवेगळ्या प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी झालीआहेत. बहुसंख्य मुले क्रीडा, कला आणि छंद वर्गाशी निगडीत नाहीत. टीव्ही आणि मोबाईलने लहान मुलांचे अवघे बालपण व्यापून टाकले आहे. मोबाईल पाहण्यात गुंतलेल्या मुलांच्या समस्येने पालकांना चिंताग्रस्त केले आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय ग्रंथालयाने हा ‘बालकुमार ज्ञान कोपरा’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.