म्हाडाच्या उत्पन्न मर्यादेत बदल
म्हाडाच्या उत्पन्न मर्यादेत नुकताच बदल करण्यात आला आहे. घरांच्या किंमती आणि उत्पन्न मर्यादेत मोठी तफावत आहे. या नवीन मर्यादेसह मुंबई मंडळाची अंदाजे ३,९०० घरांची सोडत लवकर काढण्यात येणार आहे. म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पातील घरेही महाग आहेत. उत्पन्नाची व्याख्या आणि प्रत्यक्ष उत्पन्न मर्यादा यातही गोंधळ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

गोरेगाव येथे अत्यल्प गटातील १९४७ घरे ‘पंतप्रधान आवास’ योजनेतील आहेत. त्यासाठी २५ हजार रुपये मासिक उत्पन्नाची मर्यादा असून या घरांची किंमत ३२ लाख ९४ हजार रुपये आहे. योजनेतून मिळणारे 2.5 लाखांचे अनुदान वगळता इच्छुकांना स्वत: ३० लाख ४४ हजार रुपये भरावे लागणार आहेत. मासिक उत्पन्न २५ हजार रुपये असताना ३० लाखांवर कर्ज कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दादरमध्ये अल्प गटातील घरांच्या किंमती १ कोटी ६२ लाखांच्या घरात आहेत. ७५ हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असणारे विजेते हे घर खरेदी करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. या घरासाठी गृहकर्ज मिळविण्यातही अशीच अडचण येणार आहे. मध्यम उत्पन्न गटामध्येही अशीच स्थिती आहे. उत्पन्नाची व्याख्या आणि प्रत्यक्ष उत्पन्न मर्यादा यातही गोंधळ असल्याचे म्हाडातील सूत्रांचे म्हणणे आहे. गट बदलल्याने घरे परवडणार नाहीत. या पार्श्वभूमीवर, म्हाडाने उत्पन्न मर्यादेतील, उत्पन्न गटातील आणि उत्पन्नाच्या व्याख्येतील गोंधळ दूर करावा अशी मागणी होत आहे.