
सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस मुंबईत साजरा करण्यात आला. केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सागरी व्यावसायिक क्षेत्रात स्री-पुरुष समानता आणण्याची गरज नाईक यांनी यावेळी अधोरेखित केली.
सागराशी संबंधित क्षेत्रात उत्तम कामगिरी करून दाखविणाऱ्या कॅप्टन राधिका मेनन यांच्यासारख्या स्रियांचा अभिमानपूर्वक उल्लेख करीत नाईक यांनी या क्षेत्रातील स्रियांचे योगदान आणि त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकला. सागराशी संबंधित क्षेत्रात अधिकाधिक महिलांनी पदार्पण करावे यासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती आणि सवलतींचीही त्यांनी माहिती दिली.

केंद्रीय नौवहन, बंदर आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ध्वनिचित्रमुद्रित संदेशाच्या माध्यमातून या क्षेत्रात कार्यरत स्रियांसाठी शुभेच्छा दिल्या. महिला खलाशांसाठी सरकारने विशेष तक्रार निवारण व्यवस्था उभी केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सागरी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.