तुळजाभवानी मंदिरातील निर्बंध हटवले
महाराष्ट्रातील एक शक्तीपीठ असलेल्या तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येताना सभ्यतेचे भान ठेवणारा पोशाख परिधान करून यावे, असे फलक लावण्यात आले होते. हे फलक वादास कारणीभूत ठरल्याने त्वरित सायंकाळी तहसीलदार सौदागर तांदळे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले. तुळजाभवानी मंदिरात दर्शन अथवा पूजेसाठी येणारे मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेदारी आणि भाविक-भक्तांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण या अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

मंदिर परिसरात अचानक पोषाखाबाबतचे फलक झळकल्याने वाद निर्माण झाला. मंदिर प्रशासनाने अवघ्या काही तासांमध्ये आपली भूमिका बदलून भाविकांवर आणि भक्तांवर कुठलेही निर्बंध नसल्याचे म्हटले आहे.

मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिर संस्थानाच्या वतीने नियमावली जाहीर केली होती. अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य आणि अशोभनीय वस्त्र तसेच हाफ पँट, बर्मुडा परिधान करणाऱ्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे फलक मंदिर परिसरात लावले होते. यावरुन वाद सुरु झाला. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये निर्णय बदलण्यात आला.