दगडूशेठ हलवाई मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा
पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिराला ‘क’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. हे देवस्थान ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या पुणे जिल्हा नियोजन बैठकीत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील याबाबत घोषणा केली. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, ” पुणे जिल्हा नियोजन समितीची माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मान्यता दिली”

महाराष्ट्रासह इतर राज्यातील गणेशभक्तांसाठी पुण्यातील दगडूशेठ मंदिर श्रद्धास्थान आहे. देशातील अनेक पर्यटक गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. दरम्यान, चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थानच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
पुणे जिल्हा नियोजन समितीची आज माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मान्यता दिली. तसेच मोरया गोसावी देवस्थान परिसर विकासासाठी निधी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासोबतच राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व… pic.twitter.com/HzQy9btPiU
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 19, 2023
राज्य सरकारकडून गडकिल्ले, मंदिरांचे संवर्धन करण्यासाठी तब्बल ४२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. पुण्यातील सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर आणि वाफगावच्या होळकरवाडा वास्तूंचे राज्य सरकारकडून संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

तसेच मोरया गोसावी देवस्थान परिसरच्या विकासासाठी निधी देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासोबतच राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान 10 ठिकाणचा गाळ काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
पुण्यासह संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थाला आज पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 'क' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. pic.twitter.com/0yFaZsgn4T
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 19, 2023
या बैठकीला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.