छत्रपती संभाजीनगरमध्ये सिट्रस इस्टेटचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात ‘इसारवाडी’ येथील ‘सिट्रस इस्टेट’ प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. 40 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मोसंबीची दर्जेदार आणि जातिवंत रोपे तयार करण्यात येणार आहेत.

यावेळी भुमरे म्हणाले की, “‘सिट्रस इस्टेट’ उभारणीसाठी पंजाब येथील ‘सिट्रस पार्क’चा बारकाईने अभ्यास केला. इसारवाडीतील ‘सिट्रस इस्टेट’ मधून शेतकऱ्यांना मोसंबीचे दर्जेदार रोप तयार करुन देण्यात येईल. येथे मोसंबी या फळपिकावर संशोधन देखील करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या ‘सिट्रस इस्टेट’ मध्ये प्रशिक्षण घेऊन मोसंबी लागवडीमध्ये नवनवीन प्रयोग करावेत.”
केंद्र सरकारकडून ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ अंतर्गत आणखी 12 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याने एक जागतिक दर्जाचे ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून हा प्रकल्प नावारुपास येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील, मराठवाड्यातील आणि पर्यांयाने राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्याची शक्यता आहे.

कृषी आयुक्त सुनील चव्हाण म्हणाले की, “या ‘सिट्रस इस्टेट’च्या उभारणीसाठी पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे 40 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यात 65 हजार हेक्टर मोसंबी क्षेत्र आहे. मोसंबीला आता राजाश्रय मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे वळले पाहिजे. पेप्सी, कोकोकोला अशा शीतपेयांमध्ये मोसंबीचा रस टाकता येईल का, याचा देखील राज्य सरकार विचार करीत आहे. दरम्यान, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम देखील संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आला.