
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये सोमवारपासून ‘जी-20’ सदस्यांच्या पर्यटन कार्यगटाची बैठक होणार आहे. बैठकीची तयारी आणि सुरक्षेसाठी सरकारने ठोस व्यवस्था केली आहे. दिनांक 22-24 मे या कालावधीत होणारी ही बैठक सप्टेंबरमध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या ‘जी-20’ शिखर परिषदेच्या अगोदर झालेल्या बैठकींचा एक भाग आहे.
जम्मू-काश्मीरच्या दहशतवादग्रस्त केंद्रशासित प्रदेशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. यापूर्वीच्या 2 बैठकांच्या तुलनेत या कार्यगटाच्या बैठकीत आमच्याकडे परदेशी प्रतिनिधींचे सर्वाधिक प्रतिनिधीत्व आहे, असे ‘जी-20’ चे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव ए.के. मेहता आणि केंद्रीय पर्यटन सचिव अरविंद सिंग यांच्यासमवेत त्यांनी सोमवारपासून सुरू होणाऱ्या 3 दिवसीय बैठकीच्या कार्यक्रमाची माहिती माध्यमांना दिली. ते म्हणाले, श्रीनगर 22 ते 24 मे दरम्यान तिसरी ‘जी-20’ पर्यटन कार्यगटाची बैठक आयोजित करेल. यातील पहिली बैठक फेब्रुवारीमध्ये गुजरातमधील कच्छच्या रणमध्ये आणि दुसरी बैठक एप्रिलमध्ये पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे झाली होती.

हर्षवर्धन श्रृंगला यांनी रविवारी सांगितले की, जी-20 टुरिझम वर्किंग ग्रुपच्या बैठकीत सर्वात जास्त प्रतिनिधींचा सहभाग आहे. जम्मू-काश्मीरमध्ये होणारा हा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम असेल. भारताला प्रोत्साहन देण्यासाठी समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक ओळख मांडण्यासाठी व देशाच्या पर्यटन क्षमतेचा जगासमोर प्रचार करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. ही बैठक जम्मू आणि काश्मीरकडे लक्ष वेधण्यासाठी व हस्तशिल्पांना पुनरुज्जीवित करण्यासाठी मदत करू शकते. आपली समृद्ध संस्कृती आणि वारसा सादर करण्याची ही एक संधी आहे.