
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे दर्शविणारे ७५ रुपयाचे विशेष नाणे सादर केले जाणार आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. या नाण्याच्या एका बाजूला अशोकस्तंभाचा सिंह असून ज्याच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असे लिहिलेले असेल. डावीकडे देवनागरी लिपीत ‘भारत’ आणि उजवीकडे इंग्रजीत ‘इंडिया’ लिहिलेले असेल.
या गोलाकार नाण्यावर रुपयाचे चिन्ह आणि अंकांमध्ये ७५ लिहिलेले असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संसदेचे चित्र असेल. वरच्या बाजूला देवनागरी लिपीत ‘संसद संकुल’ तर खालच्या बाजूला इंग्रजीत ‘संसद संकुल’ असे लिहिलेले असेल. नवीन संसदेच्या उद्घाटनासाठी अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले. यामध्ये काँग्रेस, डावे, टीएमसी, सपा आणि आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याऐवजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.