मेथीची लागवड
महाराष्ट्रात मेथी ही पालेभाज्यांमधील लोकप्रिय पालेभाजी आहे. मेथी पीक म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. दैनंदिन आहारात मेथीचा वापर आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे या पिकाला वर्षभर चांगली मागणी असते.

मेथी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते काळी आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत मेथीचे पीक चांगले येत नाही. रोटरच्या मदतीने नांगरणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी लागते.
मेथी या पिकाची लागवड वर्षभर करता येते. जास्त पाऊस झाल्यास, उन्हाळ्यात जास्त उन्हामुळे मेथीची वाढ कमी होते. भाजीचा सतत पुरवठा होत राहावा यासाठी टप्प्याटप्प्याने मेथी पिकाची लागवड करून वर्षभर मेथी पिकाची उपलब्धता करता येऊ शकते.

मेथी पिकाच्या मुख्य पीक म्हणून 1 हेक्टर लागवडीसाठी किमान तीन किलो बियाणे लागते. तसेच आंतरपीक घेताना गरजेनुसार बियाण्यांचे प्रमाण घ्यावे लागते. बियाणे पेरताना एकसारखे सोडावे. बीजप्रक्रिया करताना बुरशीनाशक ३ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बियाण्यांना लावावे. ‘फुले कस्तुरी’ आणि ‘कस्तुरी सिलेक्शन’ ही मेथी वाण नावाजलेली आहेत.