अमूल दूध वाद आता महाराष्ट्रात
कर्नाटक आणि तामिळनाडूनंतर आता अमूल दुधाविरुद्धचा लढा महाराष्ट्रातही पोहोचला आहे. राज्यातील दूध उत्पादक संघांनी आपले अस्तित्व वाचवण्यासाठी अमूलच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्रातील प्रसिद्ध दूध ब्रँड ‘गोकुळ’ दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अहमदनगरमध्ये विखे पाटील यांची भेट घेतली. यानंतर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, “अमूल दुधाच्या आक्रमक विस्ताराचे आव्हान पेलण्यासाठी राज्यातील सर्व दूध संघांनी एकजूट दाखवली पाहिजे.”

याशिवाय मंत्री विखे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला आवाहन करून कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सरकारांनी अमूलच्या विरोधात ज्या पद्धतीने धोरण अवलंबले आहे ते धोरण महाराष्ट्र सरकारनेही स्वीकारावे, असे सांगितले. महाराष्ट्रातील दूध व्यवसायासमोरील आव्हानांवर गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर विखे पाटील राज्यातील ‘महानंद’ दूध संघाशीही चर्चा करणार आहेत.

अमूल दुधाच्या आक्रमक मार्केटिंगच्या विरोधात काही दिवसांपूर्वी कर्नाटकात स्थानिक दूध ब्रँड ‘नंदिनी’ला वाचवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. यानंतर ‘आविन’ या दुधाचा ब्रँड वाचवण्यासाठी तामिळनाडूमध्ये अमूल दुधाविरोधात मोहीम सुरू झाली. अमूल दुधाशी संलग्न असलेल्या आनंद मिल्क युनियन लिमिटेडवर आक्रमक मार्केटिंग करून आणि दूध उत्पादक शेतकर्यांना जादा पैसे देण्याचे आमिष दाखवून स्थानिक दूध ब्रँड मार्केट नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.