प्रकाश आंबेडकरांची भाजप-शिंदे गटाशी जवळीक
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडच्या काळात अनेकवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकरांचे कौतुक केले होते.

त्यामुळे भाजप-शिंदे गटासोबत वंचित बहुजन आघाडीची जवळीक वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे. मुळात वंचित बहुजन आघाडीने काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतील ठाकरे गटाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे आंबेडकर कोणत्या बाजूने आहेत, असा प्रश्न त्यांचे राजकीय विरोधक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी आज मोठे वक्तव्य केले आहे. मध्यमांशी बोलताना आंबेडकर यांना फडणवीस यांच्या कौतुकाबद्दल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा आंबेडकर म्हणाले, “जनतेची कामे करायची असतील तर मुख्यमंत्र्यांना भेटावे लागेल त्यांच्याची अनेक मुद्यांवर चर्चा करावी लागेल.” त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.