
भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचा पाठिंबा वाढत आहे. बुधवारी देशातील अनेक नेत्यांनी ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे निवर्तमान अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. याशिवाय गुरुवारी महापंचायतही बोलावण्यात आली आहे.
भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी सांगितले की, “ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांबाबत कुस्तीपटूंच्या आंदोलनावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी महापंचायत होणार आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील शोराम गावात याचे आयोजन केले जाईल. गंगा नदीत पदकांचे विसर्जन करण्यासाठी कुस्तीपटू मंगळवारी हरिद्वारला गेले होते. त्यानंतर नरेश टिकैत आणि इतर खाप व शेतकरी नेत्यांच्या समजूतीवरून त्यांनी पदके नदीत फेकली नाहीत. टिकैत यांनी खेळाडूंकडे 5 दिवसांचा अवधी मागितला होता. या महापंचायतीत उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि दिल्ली येथील विविध प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ बुधवारी हाजरा मोर ते रवींद्र सदनपर्यंत रॅली काढली. बॅनर्जी यांनी हातात एक फलक धरला होता ज्यावर “आम्हाला न्याय पाहिजे” असे लिहिले होते. यावेळी त्या म्हणाल्या की, आमची एक टीम कुस्तीपटूंना भेटायला जाईल आणि त्यांना पाठिंबा देईल. आम्ही तुमच्या सोबत आहोत, म्हणूनच आज ही रॅली काढली आहे. उद्याही रॅली सुरू राहणार आहे. कुस्तीपटू ही आपल्या देशाची शान आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीचा निषेध केला आहे. भारतीय कुस्तीपटूंना दिलेली वागणूक अत्यंत त्रासदायक असल्याचे समितीने म्हटले आहे. कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी, असा आग्रह आयओसीने धरला आहे.