लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी विजयी होणार
2024 मध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा दावा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा विजयी होईल, असे त्यांनी म्हटले आहे. गुरूवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, “सरकारने गेल्या 9 वर्षात देशाच्या विकासासाठी उल्लेखनीय काम केले आहे. तसेच, गरिबी हटवण्याचे आणि भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधान मोदींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रोजगार वाढवण्याची गरज आहे.”

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजय आमचाच असेल. देशाच्या विकासासाठीच जनता आम्हाला निवडून देईल. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 543 पैकी 303 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, “भारताची सर्वात मोठी समस्या भूक, गरिबी आणि बेरोजगारी आहे. ग्रीन हायड्रोजन, एलएनजी आणि वीज या प्रदूषणमुक्त इंधनांवर चालणाऱ्या बांधकाम कामात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांसाठी परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार केला जात आहे. तसेच बांधकामाच्या दर्जाशी तडजोड न करता त्याची किंमत कमी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील देहू-आळंदी पालखी मार्गासाठी 12 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तुळजापूर, गंगापूर, माहूर या तीर्थक्षेत्रांचा चांगला विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”