कोबी लागवड

प्राचीन ग्रीक आणि रोमन लोकांच्या जेवणात मुख्यतः ‘कोबी’चा समावेश असल्याचे पुरावे आढळतात. कोबीचा उपयोग जवळजवळ प्रत्येक देशात, असंख्य खाद्यपदार्थांत केला जातो. कोबीमध्ये जीवनसत्त्व ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ मुबलक प्रमाणात असतात. गुरांना चारा म्हणूनही कोबी खायला देतात.

भारतात हिवाळी पीक म्हणून कोबीची लागवड करतात. डोंगराळ भागात वसंत ऋतूत आणि उन्हाळ्यातही कोबीची लागवड केली जाते. कोबी कोणत्याही जमिनीत रुजू शकते. तिला विशिष्ट प्रकारच्या अशा जमिनीची आवश्यकता नसते. ‘गोल गड्डा’, ‘पसरट गड्डा’, ‘शंक्वाकार गड्डा’ आणि ‘सॅव्हॉय’ हे कोबीचे काही अन्य प्रकार आढळतात.
कोबी लागवड करताना जमीन नांगरून भूसभूशीत करून घेतात. ४ ते ६ आठवड्यांत रोपे कायम स्वरुपातील जागेत लागवडीस योग्य होतात. दोन वाफ्यांतील अंतर ६० सेंमी. ठेवले जाते. उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर संध्याकाळच्या वेळी कोबीची लागवड करतात. लागवड झाल्यावर तिला लगेच पाणी देतात. कोबीला सतत ओलाव्याची गरज असली, तरी गड्डे तयार होऊ लागल्यावर तिला भरपूर पाणी देणे टाळावे. अन्यथा कोबीचे गड्डे फुटण्याची दाट शक्यता निर्माण होते.

घट्ट, कोवळे गड्डे तयार झाल्यावर त्यांची प्रतवारी भारतीय मानक संस्थेने ठरवून दिलेल्या मानकांप्रमाणे केली जाते. प्रतवारी करून झाल्यावर कोबी बाजारपेठांमध्ये विक्रीस पाठवतात.