घामोळ्यापासून सुटकेसाठी घरगुती उपाय

उन्हाळा म्हटला की येणारा प्रचंड घाम आणि त्या घामामुळे शरीरावर येणारे लाल चट्टे, घामोळी यांमुळे जीव अगदी हैराण होतो. जिथे घाम साचतो त्याठिकाणी हमखास आपल्याला बारीक पुरळ आलेले दिसते. त्या पुरळाला खाज सुटली की माणूस अक्षरशः बेचैन होतो. यावर काही घरगुती उपायांनी मात करता येते. पण याची तीव्रता वाढल्यास मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

‘मुलतानी माती’ कुठल्याही औषधांच्या दुकानात अगदी सहज उपलब्ध होते. आवश्यक तेवढी मुलतानी माती एका वाटीत काढायची. तिच्यात पाणी मिसळून गुठळ्या होणार नाहीत ना याकडे लक्ष द्यायचे. तिची पेस्ट बनवायची आणि जिथे घामोळ्या किंवा लाल चट्टे आहेत त्या भागावर लावायची. ती वाळल्यावर थंड पाण्याने धुवायची. एक दिवसाआड हा उपाय केल्यास तुम्हांला फरक जाणवू शकतो.

‘चंदन’ तर मूळातच थंड. त्यामुळे चंदन उगाळून किंवा चंदनाच्या पावडरची पेस्ट तयार करायची. चंदन उगाळताना किंवा चंदनाच्या पावडरची पेस्ट तयार करताना तिच्यात गुलाबपाणी मिसळावे. ते शरीराला लावावे. कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवाने. हे आठवड्यातून ३ वेळा केल्यास शरीराची होणारी लाही कमी होते.

कधी ‘दही’ अंगाला लावलेले पाहिले आहे का किंवा तुम्ही कधी लावले आहे का? जर नसेल, तर हा उपाय नक्की करा. दह्यामध्ये विषाणूंशी लढण्याची सर्वांत जास्त शक्ती असते. एका वाटीत दही घ्यायचे. ते फेटून त्याची पेस्ट करून घ्यायची आणि खाज येणाऱ्या शरीराच्या भागाला लावायची. १५ ते २० मिनिटांनी दही लावलेला भाग धुवून टाकायचा. हा उपाय जर रोज केला, तर शरीरामधील उष्णता कमी होण्यास मदत होते.

‘कोरफडी’चा गर एका वाटीत काढून घ्यायचा. तो गर जिथे घामोळ्या किंवा लाल चट्टे आले आहेत त्या भागाला लावायचा. अर्ध्या तासानंतर धुवून टाकायचा. हा उपाय तुम्ही दिवसातून कितीही वेळा करू शकतात.

‘कच्ची कैरी‘ शिजवून घ्यायची. तिचा गर काढून तो फ्रिजमध्ये ठेवायचा. मग जिथे घामोळे आहे त्या भागावर लावायचा. थोड्यावेळाने धुवून टाकायचा. त्यामुळे घामोळ्यांपासून आराम मिळतो आणि शरीरातील उष्णताही कमी होते.

‘कडुलिंब’ हा मूळातच बहुगुणी आणि औषधी आहे. कडुलिंबाची पाने एक लीटर पाण्यात उकळवून घ्या. त्या पाण्याने दररोज आंघोळ केल्यास उन्हाळ्यामुळे येणाऱ्या घामोळ्याचा, लाल चट्ट्यांचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे तुम्ही कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करूनही ती लावू शकतात. ती लावल्यावर १५ मिनिटांनी धुवून टाकायची. आठवड्यातून दोन वेळा ही पेस्ट लावल्यास फरक जाणवेल.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *