पुण्यात जी-२० च्या डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाची बैठक
‘जी-२०’ देशांच्या डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाची तिसरी बैठक पुण्यात सुरू झाली असून १४ जूनपर्यंत चालणार आहे. यावेळी सर्वसमावेशक सामाजिक आणि आर्थिक वाढ साध्य करताना कार्यगटाच्या प्राधान्य क्षेत्रांना अधिक गती देण्यावर चर्चा होणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील सचिव अल्केश कुमार शर्मा यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

या बैठकीत पहिल्या दिवशी जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिषद आणि जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनात डिजिटल ओळख, डिजीलॉकर, मृदा आरोग्य पत्रिका, ई नाम अशी विविध १४ क्षेत्रे आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर या परिषदेचे आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत. या परिषदेसाठी सुमारे ४६ देश आणि १५० परदेशी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सदस्यांमध्ये प्रामुख्याने डिजिटल सार्वजनिक सुविधा, सायबर सुरक्षा आणि डिजिटल कौशल्य यावर व्यापक चर्चा होणार आहे.