
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत या नियुक्त्या झाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी वर्षांत पहिल्यांदाच पक्षाने कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राचीही जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक अधिकार समितीच्या अध्यक्षपदीही सुप्रिया सुळेंची नियुक्ती करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबची जबाबदारी असणार आहे. महिला-युवक आणि लोकसभेतील पक्षाचे कामकाज त्या पाहतील. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी तसेच, राज्यसभेतील पक्षाचे कामकाज आणि आर्थिक घडामोडी पहाव्या लागतील.

सुनील तटकरे हे राष्ट्रीय महासचिव असतील. त्यांच्याकडे ओडिशा, प.बंगालची जबाबदारी असणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील समितींच्या बैठका, संसद अधिवेशन, निवडणूक आयोग, अल्पसंख्याकविषयक मुद्दे हाताळतील.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बिहार, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर, कर्नाटकची जबाबदारी असेल. योगानंद शास्त्री हे राष्ट्रीय समिती सेवा दल आणि दिल्ली प्रदेशाध्यक्ष असतील. के. के शर्मा यांच्याकडे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचलची जबाबदारी असेल. मोहम्मद फैजल यांच्याकडे तमिळनाडू, पुदुचेरी, तेलंगणा, केरळची जबाबदारी असेल. नरेंद्र वर्मा हे ईशान्येकडील राज्ये सांभाळतील.