महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा करणार
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहामध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्मदिवस ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. क्रीडा पुरस्कारांच्या रकमेतही वाढ करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर यांना जीवनगौरव प्रदान करण्यात आला. तिसरे जीवन गौरव पुरस्कार विजेते आदिल सुमारीवाला परदेशात असल्यामुळे पुरस्कार स्विकारू शकले नाहीत. क्रीडापटूंना व संघटकांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा संचालक सुहास दिवसे यांच्यासह अनेक आजी-माजी क्रीडापटू उपस्थित होते.
क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी पुढील वर्षीपासून पारितोषिक रकमेत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी यासाठी तयारी दाखवून मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. खेळाडूंसाठी खर्च होणार असेल, तर जरूर करावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.