नवी दिल्लीत ‘भारत मंडपम’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे आयोजित ‘जी-ट्वेन्टी युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनाले’ या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात जवळपास ३ हजार विद्यार्थी, प्राध्यापक आणि सहभागी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित असणार आहेत. देशभरातील विद्यार्थी थेट प्रक्षेपणाद्वारे या कार्यक्रमात भाग घेतील. जी-ट्वेन्टी लोकसहभाग चळवळीत देशातील विविध शाळा, उच्च शिक्षण संस्था आणि कौशल्यविकास संस्थांमधून विक्रमी ५ कोटीपेक्षा अधिक तरुण-तरुणींनी भाग घेतला होता.
देशातील तरुणाईमध्ये भारताच्या जी-ट्वेन्टी अध्यक्षतेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि जी-ट्वेन्टी आयोजनांमध्ये युवा वर्गाचा सहभाग वाढविण्यासाठी ‘जी-ट्वेन्टी युनिव्हर्सिटी कनेक्ट’ या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरुवातीला ७५ विद्यापीठांसाठी नियोजित केलेला हा कार्यक्रम पुढे विस्तार पावून १०१ विद्यापीठांपर्यंत पोहोचला. याअंतर्गत देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.