एक गाव-एक गणपती

गणेशोत्सव म्हणजे एक आनंदी सोहळा असतो. काही ठिकाणचे गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतात. अनेक ठिकाणी आजही सामूहिकरित्या श्री गणेश पूजन केले जाते. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आसनगावमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना राबविली जाते. येथील ग्रामस्थ असा सामूहिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. आसनगाव येथील सूर्यवंशी क्षत्रिय समाज गणेशोत्सव मंडळाने गेल्या ८३ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे.
सन १९४० साली येथील ग्रामस्थांनी या मंडळाची स्थापना केली. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. केवळ दीड दिवसांच्या गणेशाचे पूजन करण्यात आले होते. त्यानंतर सन १९७८ साली ग्रामस्थांनी मिळून एक सभागृह बांधले. आता गौरी आणि गणपती यांना येथून एकत्र निरोप देण्यात येतो. या गावामध्ये सध्या ५२ कुटुंबे आहेत. २५० ते ३०० ची लोकवस्ती आहे. आजही येथील ग्रामस्थ एकाच ठिकाणी जमा होऊन उत्सव साजरा करतात.
नोकरीधंद्यानिमित्त अन्य ठिकाणी गेलेले ग्रामस्थ गणेशोत्सवाला गावी येतात. मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांसाठी स्पर्धा व वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांमध्ये सर्वांचा सक्रीय सहभाग असतो. सर्व आबालवृद्ध या सोहळ्यात आनंदाने सहभागी होऊन गणेशोत्सवाची मजा लुटतात. आरती, भजन, नैवेद्य या साऱ्या गोष्टी एकत्रितपणे करताना त्यांना मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.