वानखेडे स्टेडियमवर रोज सचिन भेटणार

मुंबईमधील वानखेडे स्टेडियम आणि शतकवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यातील खास नात्याविषयी अधिक काही सांगायला नको ! त्याबाबत सगळेच परिचित आहेत. आपल्या शैलीने सचिनने हे स्टेडियम एके काळी गाजवले आहे. त्याचेच स्मरण म्हणून या स्टेडियमवर आता सचिनचे शिल्प साकारण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर, २०२३ ला या कलाकृतीचे अनावरण करण्यात येणार आहे.
खेळाच्या कारकिर्दीत चौकार आणि षटकारांची आतीषबाजी करणाऱ्या सचिनची षटकार मारतानाची एक प्रसिद्ध पोझ या शिल्पाद्वारे कायमस्वरूपी वानखेडे स्टेडिअममध्ये पहायला मिळणार आहे. ही कलाकृती २२ फुटी आहे. नगरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी ती साकारली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या चेंडूवर सचिनने षटकार मारतानाची ही पोझ असल्याचे सांगण्यात येते.
सचिनच्या पन्नासाव्या वाढदिवसावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनने सचिनचे शिल्प या स्टेडियममध्ये उभारण्याची घोषणा केली होती. हा पुतळा कांस्यपासून तयार करण्यात आलेला आहे. मुख्य मूर्तीची उंची १० फूट असून हातातील बॅट ४ फूट असे चौदा फूट उंचीचे हे शिल्प आहे. त्याखाली जगाचे चिन्ह म्हणून क्रिकेटचा चेंडू साकारण्यात आला आहे. ‘सचिन रमेश तेंडुलकर’ असे पूर्ण नाव त्यावर कोरण्यात आले आहे. चेंडूच्या पॅनेलवर सचिनचे विविध विक्रम नमूद करण्यात आले आहेत. हे शिल्प एकूण २२ फूट उंचीचे झाले आहे.
प्रमोद कांबळे यांनी हे शिल्प साकारले. त्यावेळी त्यांच्याकडे अयोध्येच्या राम मंदिरातील काम सुरू होते. त्यांना सचिनचे शिल्प साकारण्यासाठी त्यांचे बंधू अजित तेंडुलकर यांची मदत झाली. त्यामुळे सचिनच्या मूर्तीतील बारकावे साकारता आले. त्यांनी त्यांच्या नगरच्या स्टुडिओमध्ये सुमारे आठ महिने यावर काम केले. अजित तेंडुलकर यांनी त्यांना जुनी छायाचित्रे दाखविली. त्यातील षटकार मारतानाची एक पोझ निश्चित झाली. शिल्प साकारताना सचिनची नजर, हेल्मेटवरील लोगो यासह सर्व बारकाव्यांवर त्यांनी खूप मेहनत घेतली. उत्तम कलाकृती साकारण्यासाठी क्ले आणि काही साहित्य त्यांनी जपानहून मागविले आहे. आता या शिल्पाचे अनावरण केल्यानंतर क्रिकेटप्रेमींना तसेच स्टेडियमवर जाणाऱ्यांना रोज सचिनला पाहता येणार आहे. शिवाय, अर्थातच, येथे हे शिल्प पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी होणार आहे, हे निश्चित !