बोपेगाव ग्रामपंचायतींचा अनोखा निर्णय

ग्रामपंचायतीचे कर हे ग्रामपंचायतींचे उत्पन्नाचे साधन असते. परंतु, वेळेत कर भरणारे ग्राहक तसे कमीच असतात. मग ग्रामपंचायतींना अनेक युक्त्या करुन कर भरुन घ्यावा लागतो. साम-दाम-दंड अशा अनेक प्रकारांचा अवलंब केला जातो. असाच एक उल्लेखनीय प्रकार नाशिक जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत राबवीत आहे. बोपेगाव ग्रामपंचायतीने नियमितपणे कर भरणाऱ्या सर्व ग्रामस्थांना दिवाळी भेट देण्याचा अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. नियमित कर भरणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामपंचायत अवघ्या वीस रुपये किलो दराने साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियमित करदात्यांची दिवाळी गोड होणार आहे. सरपंच वसंतराव कावळे यांनी ही माहिती दिली.
शासकीय कामांसाठी ग्रामपंचायतीकडून लागणाऱ्या कागदपत्रांकरिता थकबाकी भरण्याची अट अनेक ग्रामपंचायती ठेवतात. त्यामुळे शासकीय काम अडले तरच लोक कर भरतात. आता नागरिकांनी कर भरावा यासाठी बोपेगाव ग्रामपंचायतीने चांगलीच शक्कल लढवली आहे. साखर हा प्रत्येक कुटुंबाचा जीवनावश्यक पदार्थ आहे. दिवाळीत तर या पदार्थाला मोठी मागणी असते. ग्रामपंचायत प्रशासनाने नियमित कर भरणा करणाऱ्या सर्व ग्रामस्थांसाठी दिवाळीनिमित्त २० रुपये प्रति किलो दराने साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक असून त्याशिवाय गावाचा विकास होणे अवघड आहे. त्यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीची थकीत करवसुली होण्यासाठी हातभार लागणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच कावळे, उपसरपंच योगेश कावळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल कावळे आदींनी केले आहे.