बॉलपेन निर्मिती

आज प्रत्येक घराची आणि प्रत्येक माणसाची पेन ही गरज आहे. व्यक्तीला दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणाने पेनची गरज असते. प्राचीन काळी लेखणीने लेखन केले जात असे. त्यानंतर दौत आणि टाक आले. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी शाईचे पेन वापरात होते. शाईचे भांडे, निप्पल, झिप असे साहित्य शाई पेनसाठी वापरले जायचे. आज त्याची जागा बॉलपेनने घेतली आहे. शाई पेनची शाई संपली की ती पुन्हा भरावी लागे. शाई भरताना अनेक वेळा कागदावर आणि कपड्यांवर शाईचे डाग पडत असत. पेनाची निप्पल आणि झिप तुटायची. बॉलपेनमुळे या त्रासातून सुटका झाली. बॉलपेन वापरण्यास अत्यंत सोपे, सोयीस्कर असल्यामुळे आज शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत, बँकांचे कर्मचारी, इत्यादी सर्वजण बॉलपेन वापरतात.
बाजारातील मागणीनुसार डिझाईन्सची विविध पेने बाजारात विक्रीसाठी आणल्यास तुमच्या मालाला अधिक मागणी येईल. शक्य असल्यास, या पेनांना नावे देऊन तुमच्या उत्पादनांचे ‘ब्रँड नाव’ तयार करा. जर मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार असाल, तर जवळच्या मोठ्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार माल तयार करून पाठवा. मालाचे उत्पादन कमी प्रमाणात होत असेल तर तयार मालाचे स्वतः विपणन करून विक्री करा. स्थानिक बाजारपेठेतील स्टेशनरी दुकाने, किराणा दुकाने, मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स अशा ठिकाणी रोखीने वस्तू विकू शकता. एखादा विक्री प्रतिनिधी नियुक्त करा. या व्यवसायासाठी पॉली पॉलीप्रॉपिलीन, निळी शाई, नोझल्स, प्लास्टिक पावडर, वेष्टनासाठी प्लास्टिक पेपर कव्हर इ., स्क्रीन प्रिंटिंग मशीन, शाई भरण्याचे मशीन, ओव्हन, बॉल पेन इ. कच्चा माल गरजेचा असतो. तसेच हँडमोल्डेड, मशीन, नोझल बनविण्याचे यंत्र, आदी यंत्रसामग्री आवश्यक असते.
आजच्या युगात शिक्षणाचा व्यापक प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे लोकांना शिक्षणाचे महत्त्व चांगलेच पटले आहे. चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे ग्रामीण भागात राहणाऱ्या पालकांनाही समजत असल्याने मुलांचे दहावीच्या आधी शिक्षण कोणीही थांबवत नाहीत. प्रत्येक घरातील मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकजण किमान दहावीपर्यंत शिक्षण घेताना दिसत आहे. सरकारनेही मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बॉलपेन ही गरज झाली आहे.