लाभार्थ्याच्या दृष्टीतील शौचालय दिन साजरा

नाशिकमधील कळवण तालुक्यात एका शौचालय लाभार्थ्याने चक्क् शौचालय दिन साजरा केला. १९ नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिनी त्याने शौचालयांना रंग देऊन दारांना तोरणे बांधली, समोर सुरेख रांगोळी रेखाटून रंगीबेरंगी फुग्यांची सजावट केली. सुळे गावातील गुलाब ठाकरे यांनी स्वत:च्या घरी शौचालय दिन साजरा केला.
दरम्यान, गावात घरोघरी शौचालये झाल्यामुळे रविवारी आनंद व्यक्त करण्यात आला. सणवार असल्याप्रमाणे हा दिन साजरा करण्यात आला. त्यामुळे हा सगळीकडे चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी सरपंच भारती चव्हाण, उपसरपंच प्रमिला गावित, महिला बचत गट प्रमुख विमल बागूल, कविता गवळी, कविता बागूल, सोमनाथ भोये, बन्सीलाल गांगुर्डे, पोपट बागूल, मीना पवार, ग्रामसेवक देविका ठाकरे आदींनी येथे भेट देऊन लाभार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.
या तालुक्यात आदिवासींची संख्या जास्त आहे. शिक्षणाचा अभाव असल्याने अनेक समस्या होत्या. शौचालयांचा वापर करणे माहीतच नव्हते. आर्थिक विवंचनाही होत्या. स्वतःचे घर तर नव्हतेच. त्यामुळे शौचालयाचा वापरसुद्धा मर्यादित होता; मात्र, शासकीय पातळीवर हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांमुळे येथील लोकांना शौचालयाचे महत्त्व पटू लागले. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींमार्फत ‘हर घर शौचालय’ अभियान राबवून या गावातही शौचालये बांधण्यात आली.