यादीतून वगळूनही पुरस्कारास पात्र
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. मात्र या पुरस्काराभोवती बारीकसारीक वाद नेहमीच पिंगा घालताना दिसतात, आता राज्य सरकारने घेतलेला निर्णय बराच चर्चेत आहे. राज्यातील सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार पुरस्कार द्यावयाच्या यादीतून अश्वारोहण, गोल्फ, कॅरम, पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, बिलियर्ड्स आणि स्नूकर यॉटिंग या सहा खेळांना वगळण्यात आले आहे. या खेळांसाठी पोषक वातावरण राज्यात नसल्याने हे खेळ वगळण्यात आल्याचे सरकारने सांगितले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अश्वारोहणमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते. या विजेत्या संघात महाराष्ट्रातील मुंबईच्या हृदय छेडाचा समावेश असून तो खेळाडू मात्र या पुरस्कारासाठी पात्र ठरला आहे. हा खेळच पुरस्कार दिल्या जाणाऱ्या खेळांच्या यादीतून वगळल्याने चर्चा वाढली आहे. दरम्यान, केंद्र सरकार अश्वारोहकांना अर्जुन पुरस्काराने गौरवत आहे. यावेळच्या केंद्राच्या क्रीडा पुरस्कार यादीतही अश्वारोहक आहे. देशभरातही अश्वारोहणाच्या सुविधा नसतानाही हा पुरस्कार दिला आहे. त्यामुळे राज्यानेही हा खेळ पुरस्कारांमधून वगळू नये, असे मत ‘अॅमेच्युअर्स रायडर्स क्लब’चे श्याम मेहता यांनी व्यक्त केले आहे. खेळांच्या यादीतून अश्वारोहण खेळ वगळला असला तरी संबंधित खेळातील खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यास त्याला थेट पुरस्कार दिला जाणार असल्याचे राज्याचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले आहे.