जनरल स्टोअर

प्रत्येक गाव तसेच शहरात जनरल स्टोअर असतातच. जनरल स्टोअर म्हणजे माणसाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणारे दुकान होय. यालाच ‘किराणा दुकान’, ‘भुसारी दुकान’ असेही म्हणतात. घरात रोजच्या वापरासाठी लागणारी धान्ये, तेल, तूप, साबण, दंतमंजन, इ. वस्तू मिळते. या दुकानांचा व्याप, आकार हा त्या व्यक्तीने केलेल्या गुंतवणुकीवर, त्याच्या ग्राहकांच्या संख्येवर अवलंबून असतो. किराणा दुकानाचा व्यवसाय भारतात काही शतकांपासून चालत आला असून आजही त्याचे अस्तित्व टिकवून आहे. भारताच्या लहान मोठ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये कोट्यवधींच्या संख्येत अशी छोटी-मोठी दुकाने आहेत. ग्राहकांना आवश्यक सामान आणि दैनिक गरजेच्या वस्तू या दुकानात उपलब्ध करुन दिल्या जातात.
काही ठिकाणी दुकानांमध्ये उधारीवर वाणसामान देण्याची सोय असते. अलिकडे काही दुकानदार मोफत घरपोच सेवा देतात. काहीजणांकडे डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन खरेदीची सुविधा असते. परंतु या व्यवसायासाठीसुद्धा ठोस नियोजन हवे. अन्यथा, कुठलाही व्यवसाय बुडायला वेळ लागणार नाही. किराणा मालाच्या दुकानातून वीस ते साठ हजार रुपये महिना कमाई होऊ शकते. आपल्याला असे दुकान सुरु करावयाचे असल्यास जिथे व्यवसाय करायचा आहे, तेथील ग्राहकांचा अभ्यास करा. त्यानुसार आपल्या दुकानात सामान ठेवा. ते कोणत्या गोष्टी खरेदी करु शकतील, अशाच वस्तू ठेवा. या व्यवसायासाठी काही परवाने गरजेचे असतात. त्यात दुकाने आणि संस्था नोंदणीचा दाखला, अन्न परवाना, व्यवसायधारकाचा परवाना घ्या.
आपले दुकान एखाद्या शाळा, महाविद्यालयाजवळ असेल तर स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने, खाद्यपदार्थ दुकानात ठेवणे योग्य असेल. गावातील दुकानात महागड्या वस्तू ठेवणे फायद्याचे ठरणार नाही. आपले दुकान डिजिटल करण्याचा प्रयत्न करा. घरपोच व तात्काळ सेवा द्या. आपल्या दुकानातील वस्तू आपण ऑनलाईनदेखील विकू शकता. आपल्या व्यवसायाची जीएसटी अतंर्गत नोंदणी केल्यास आपल्याला विविध करांवर सवलती मिळू शकतात. आपली वार्षिक व्यावसायिक उलाढाल 20 लाखांपेक्षा जास्त असेल तर आपल्याला जीएसटी क्रमांक अनिवार्य आहे. दुकान चालू ठेवण्याची वेळ ठरवून घ्या. बरेच ग्राहक आठवडी सुट्टीच्या दिवशी खरेदी करणे पसंत करतात. त्यामुळे आठवडी सुट्टीच्या किंवा सणावारांच्या दिवशी दुकान चालू ठेवल्यास ते आपल्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करणे कठीण नाही. फक्त आपली नकारात्मक भूमिका दूर करायला हवी. प्रामाणिक प्रयत्न, उत्तम संवाद हातोटी, सेवाभावी वृत्ती, दर्जेदार माल, घरपोच व तात्काळ सेवा, कष्ट करण्याची तयारी ही कौशल्ये अंगी असल्यास या व्यवसायात भरभराट नक्कीच आहे.