मोबाईल फोन असेंबलिंग प्लांट
गेल्या काही वर्षांत मोबाईल फोनमुळे संवाद अधिक सोपा आणि जलद झाला आहे. मोबाईल फोन हे विशेषतः व्यवसायाचे महत्त्वाचे साधन बनले आहे. मोबाईल निर्मिती व्यवसायात सतत वाढत असलेल्या मागणीमुळे एक तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. ‘मोबाईल फोन असेंबलिंग प्लांट’हा एक सध्याचा मोठा उद्योग आहे. याला सॉफ्टवेअर, डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह असणाऱ्या फोनसाठी सेवा प्रदात्यांकडून ऑर्डर मिळतात. मोबाईल निर्मिती करणाऱ्या उद्योगांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रति युनिट उत्पादन खर्च शक्य तितका कमी ठेवावा लागतो. यामुळे मोबाइल फोन कंपन्यांनी उत्पादनबाह्य विक्रेत्यांना किंवा विकसनशील देशांना ‘आउटसोर्स’ करण्यास प्रवृत्त केले आहे. जेथे मजूर स्वस्त आहेत, अशा ठिकाणी मोबाइल फोन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखली जाते.
हा व्यवसाय सुरु कताना मनुष्यबळ मिळण्यासाठी त्या जागी योग्य पात्रता असलेले लोक आहेत का? वाहतूक खर्च परवडणारा आहे का ? आपल्या व्यवसायाला पूरक बाजारपेठ आहे का ? याचा विचार केला जातो. फोनच्या वास्तविक उत्पादनामध्ये हार्डवेअर आणि फोन चालविणाऱ्या सॉफ्टवेअरची गरज असते. लक्षात घ्या, की फोन असेंबलिंग व्यवसाय हा हार्डवेअर व सॉफ्टवेअर विकसित करू शकतो. या कंपन्यांना नवीन डिझाइन्ससाठी सतत संशोधन करावे लागते. मोबाईलची डिझाइन प्रक्रिया अनेक टप्प्यांतून जाते. प्रत्यक्ष उत्पादनादरम्यान एलसीडी, की पॅड, अँटेना, बॅटरी, मायक्रोफोन आणि सर्किट बोर्ड असे सर्व भाग एका ‘असेंबली लाइन’मधून जातात, जेथे यंत्रे त्यांना उचलतात, आणि मोबाइल फोन युनिटमध्ये एकत्र ठेवतात. त्यानंतर प्रत्येक मोबाइल फोनचा प्रत्येक भाग आणि वैशिष्ट्य – जसे की बॅटरी, व्हिडिओ, कीपॅड, मेसेजिंग आणि कॉलिंग हे खूप चांगले कार्य करते आहे का, याची खात्री करण्यासाठी कठोर चाचणी केली जाते. गुणवत्तेच्या चाचण्यांमध्ये अपयशी ठरणारी गोष्ट लगेच बदलली जाते. ज्या फोनची चाचणी यशस्वी झाली आहे, असे फोन नंतर पॅकेजसाठी पाठवले जाऊन वितरणासाठी सिद्ध होतात. मोबाईल फोन उद्योग प्रामुख्याने मोबाईल फोन हँडसेटसह मोबाईल फोनच्या निर्मितीमध्ये गुंतलेला आहे.
हा व्यवसाय करण्यासाठी याबाबतचे पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. केवळ यंत्रसामग्री आणून त्याद्वारे मोबाईल तयार करता येत नाहीत. त्यासाठी या व्यवसायाचे पूर्ण ज्ञान घ्यावे. अशा उद्योगांमध्ये काम करावे. सरकारकडून व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षणे दिली जातात. अशा प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा. सॉफटवेअर, हार्डवेअरविषयीचे पूर्ण ज्ञान घ्यावे. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, मोबाईल फोन उद्योग हे आजच्या संप्रेषण उद्योगातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. जागतिक स्तरावर मोठ्या संख्येने लोकांना आकर्षित करणाऱ्या ट्रेंडपैकी एक आहे. उद्योगतज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, हा उद्योग पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने पुढे जाण्यावर केंद्रित आहे. नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पनांसोबत वाढणारा हा जगातील सर्वात वेगवान उद्योगांपैकी एक आहे.