रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या लष्करात मोठे बदल केले आहेत. त्यांनी लष्करप्रमुख व्हॅलेरी झालुझनी यांना हटवून कमांडर जनरल अलेक्झांडर सिर्स्की यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. झेलेन्स्की यांनी शुक्रवारी ट्विटरवर म्हंटले, की लष्कराच्या नेतृत्वात बदल करण्याची वेळ आली आहे. झेलेन्स्की यांनी व्हॅलेरी झालुझनी यांचे त्यांच्या दोन वर्षांच्या सेवेबद्दल आभार मानले. झेलेन्स्की यांनी अलीकडेच सूचित केले होते, की ते रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान देशाचे लष्करी नेतृत्व बदलण्याचा विचार करीत आहेत. व्हॅलेरी झालुझनी सैन्याचा भाग राहतील. त्याचबरोबर रशियाविरुद्ध आम्ही नक्कीच जिंकू.
‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या वृत्तानुसार, युद्धाच्या सुरुवातीपासून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि झालुझनी यांच्यात मतभेद होते. तथापि, झेलेन्स्की यांनी फाटाफुटीची चर्चा फेटाळून लावली. अहवालात असेही म्हटले आहे की व्हॅलेरी झालुझनी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. भविष्यातील निवडणुकीत झेलेन्स्की यांना त्यांचे संभाव्य आव्हान असू शकते. देशातील काही लोकांनी व्हॅलेरी झालुझनी यांना झेलेन्स्की यांचे प्रतिस्पर्धी मानण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, युक्रेनच्या लष्कराने गुरुवारी पूर्व युक्रेनमधील ‘अवडिव्हका’ शहराजवळ रशियन हल्ला करणारे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. ‘अवडिव्हका’मध्ये सैनिक रस्त्यावर लढत आहेत. युक्रेनचे रक्षण करणाऱ्या सैन्याला घेराव घालण्यासाठी रशियाच्या सैन्याने चार महिन्यांची मोहीम तीव्र केली आहे.
दक्षिण-पूर्व आघाडीवर लढणाऱ्या युक्रेनच्या युनिट्सचे कमांडर अलेक्झांडर टर्नावस्की यांच्या मते, युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या हवाई दलाच्या सर्वात धोकादायक सैन्यांपैकी एकाचा सामना केला आहे.