बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास
बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच ओबीसी अर्थात इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. राज्यातील बारा बलुतेदार समाज संघटनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते.
बारा बलुतेदार समाजासाठी विश्वकर्मा कौशल्य प्रशिक्षण योजनेची कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोविड काळात टाळेबंदीमुळे व्यवसाय बंद राहिले. त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून नाभिक समाजातील काही व्यक्तींनी आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.