ठाण्यात ई बसगाड्यांचे लोकार्पण
राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई बस चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरु झाले आहे. पाच हजाराहून अधिक डिझेल बस एल.एन.जी. मध्ये परावर्तित करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. अशा प्रकारच्या बस सेवेत आल्यानंतर निश्चितच प्रदुषणात घट होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे येथे प्रदुषणमुक्त, पर्यावरणपुरक, वातानुकुलित किफायतशीर दरात धावणाऱ्या ५१५० ई बसगाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एसटीच्या खोपट डेपो येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पर्यावरण समतोल राखण्याचे कामही आता एसटीच्या माध्यमातून सुरु झाले आहे. त्यामुळेच मागील काही वर्षात तोट्यात सुरु असलेली एसटीची सेवा पुन्हा चांगल्या पध्दतीने सुधारताना दिसत आहे. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यात आता एसटीने देखील कात टाकली आहे. या इ-बसगाड्या बोरीवली-ठाणे-नाशिक या मार्गावर चालवल्या जाणार आहेत. टप्याटप्याने राज्याच्या प्रत्येक भागात ही बससेवा सुरु होणार आहे.