बिग बींचा पाठीवर हात
छत्रपती संभाजीनगरमधील एका सफाई कामगारांच्या बचतगटाची दखल थेट दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी घेतली. मुळात सफाई कामगार हा असंघटित आणि पांढरपेशा समाजापासून दूर असतो. त्यांना त्यांच्या मौल्यवान कामाचे मानधनही कमीच मिळत असते. त्यांना प्रतिष्ठा आणि चांगले उत्पन्न मिळण्यासाठी महापालिकेने सन २०१५ साली शहराच्या छोटा मुरलीधरनगर परिसरातील पुरुष सफाई कामगारांना एकत्र आणले. त्यांचा ‘स्वच्छतारत्न बचतगट ’ स्थापन करुन बचतगट स्थापन केला. या बचत गटाला चिखलठाणा येथील ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या शाखेत खाते उघडण्यासाठी मान्यता मिळाली. त्यानंतर बचतगटाने या बँकेत संयुक्त खाते उघडले. २० ऑगस्ट २०२१ रोजी बँकेने बचतगटाला दहा हजारांचे खेळते भांडवल व दहा लाख रुपयांचे कर्जदेखील दिले. बचत गटाचे अध्यक्ष म्हणून सुनील कपुरसिंग सिरसवाल यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून गुलाबसिंग हुकूमसिंग तुसामड यांची निवड करण्यात आली.
या बचत गटाने साफसफाईच्या कामासाठीची वाहने व यंत्रसामग्री खरेदी केली. या बचत गटाला महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या मदतीने चाळीस ते पन्नास सोसायटींमधील साफसफाईचे काम मिळाले. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले, परिणामी राहणीमान सुधारले. समाजात मानसन्मान मिळू लागला. बँकेच्या कर्जाची परतफेड नियमित असल्यामुळे बँकेतही आदर वाढला.
पालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत, उपायुक्त अंकुश पांढरे यांचे मार्गदर्शन या गटास मिळत आहे. या स्वच्छतारत्न बचत गटाच्या कामाची दखल अमिताभ बच्चन यांनी घेतली. त्यांच्या हस्ते बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. बच्चन यांनी या बचत गटाला दहा स्वच्छतायंत्रे वाहनासह भेट म्हणून दिली.