निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शन अशा सर्वच क्षेत्रात ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके यांचा हा चित्रपट. या चित्रपटाने कमाईसुद्धा मोठी केली. सन 1991 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
आता तब्बल 34 वर्षानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांचा ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. मराठी प्रेक्षकांची अभिरुची ओळखून त्यानुसार यशस्वी चित्रपट निर्मिती करण्याची विजय कोंडके यांची गुरुकिल्ली आहे.
विजय कोंडके म्हणाले की, ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशापलीकडे या चित्रपटाने मला रसिकांचे प्रचंड प्रेमही दिले. रसिकांच्या याच प्रेमापोटी ‘लेक असावी तर अशी’ हा नवा मराठी चित्रपट मी 26 एप्रिलला घेऊन येत आहे.”
या चित्रपटात अभिनेत्री गार्गी दातार, शुभांगी गोखले, यतीन कार्येकर, प्राजक्ता हणमगर, सविता मालपेकर, सुरेखा कुडची, कमलेश सावंत, ओंकार भोजने, अभिजित चव्हाण, नयना आपटे आहेत.