पशूपालनासाठी योजना

आता गाय-म्हशी, मेंढ्या-शेळ्या, कोंबड्या, मासे इत्यादींशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याची इच्छा पूर्ण करणे सोपे झाले आहे. सरकारने असे व्यवसाय सुरू करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे शेतकऱ्याला काही मिनिटांत पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू होते.
किसान क्रेडिट कार्ड योजना सन २०१९ पासून पशुपालकांसाठी चालवली जात आहे; परंतु अनेक पशुपालक,कुक्कुटपालक किंवा मत्स्यपालकांकडे स्वतःची जमीन नाही, त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. सन २०२१ पासून भूमिहीन शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे,
असा व्यवसाय करु इच्छिणारे पशुपालक पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने आणि कृत्रिम रेतन केंद्रांना भेट देऊन फॉर्म भरू शकतात. फॉर्मसोबत आधार कार्ड, दोन छायाचित्रे व बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.तसेच कोणीही बँकेचे डिफॉल्टर नसावे.अशा लोकांना लाभ मिळणार नाही.त्यासोबतच पशुपालक सेवा केंद्रातूनही फॉर्म भरू शकतात. गाय-म्हशी,मेंढ्या- शेळी, कुक्कुटपालन, मासे आणि ससेपालन करु इच्छिणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे १,६०,००० रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही कागदाची आवश्यकता नाही. जर एखाद्या पशुपालकाने १,६०,००० ते ३,२०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले, तर त्याला जनावरांचा विमा आणि तो कोठून खरेदी केला यासारखी बरीच माहिती बँकेला द्यावी लागते. जर तुम्ही जून महिन्यापर्यंत कर्जाची परतफेड केली असेल तर नंतर फक्त ४ टक्के व्याज आकारले जाते. जर तुम्ही जूननंतर कर्जाची परतफेड केली तर तुम्हाला ७ टक्केपर्यंत व्याज द्यावे लागेल. जर तेच कर्ज सहकारी बँकेकडून घेतले असेल तर आणखी १ टक्का सवलत मिळते. जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड केली तर तुम्ही भविष्यातही त्यासाठी अर्ज करू शकता.